शिर्डी : राज्यातील भाजप-शिवसेना युतीची सत्ता उलथवून टाकण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व धर्मनिरपेक्ष व पुरोगामी शक्तींनी एकत्र आले पाहिजे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सामावून घेण्याबाबत मनसेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी आज शिर्डी येथे साईबाबा मंदिरास भेट देऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.थोरात म्हणाले, काँग्रेस आघाडीला वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत ९ जागांचा फटका बसला. सध्या सत्तेवर जे आलेत ते राज्यघटनेमुळेच आलेत, मात्र अलीकडच्या काळात लोकशाही, राज्यघटनेतील मूलभूत तत्वांना सुरूंग लावला जात असल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही चांगली, सदृढ राहावी यासाठी साईबाबांना साकडे घातल्याचे थोरात यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेण्याच साईबाबांचे जे तत्वज्ञान आहे तोच काँग्रेसचा विचार आहे. काँग्रेसचे विचार, तत्वज्ञान सर्वसामान्यांच्या अंत:करणात आहे. त्याला साद घालण्याचे काम करावे लागेल, असे सांगत थोरात यांनी यामध्ये नक्की यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, काँग्रेसचे डॉ़ एकनाथ गोंदकर, राष्ट्रवादीचे निलेश कोते आदी उपस्थित होते.